आपण अनेकदा रिक्षातून प्रवास करतो, पण एखाद्या रिक्षाचा चालक कोट्यधीश असेल असे तुम्हाला कधी वाटले आहे? नाही ना? मात्र एका रिक्षाचालकाने ही गोष्ट खरी करुन दाखवली आहे. हा कोट्यधीश रिक्षाचालक आपल्यासाठी नक्कीच प्रेरणा ठरु शकतो. मेहनत आणि जिद्द यांच्या जीवावर हरीकिशन पिप्पल या रिक्षाचालकाने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे.
आज कोट्यवधींचा मालक असलेला हरीकिशन एका अर्थिक दुर्बल कुटुंबातून आला आहे. त्याच्या वडिलांचे चप्पल दुरुस्ती करण्याचे दुकान होते. व्यवसायातील अल्पउत्पन्नामुळे कुटुंबातील सर्वांना दोन वेळचे जेवण मिळणेही अवघड होते. ही परिस्थिती पाहून लहान वयातच हरीकिशन मजुरीची कामे करु लागला. मात्र त्याने शिक्षण सोडले नाही. दिवसभर काम करुन तो रात्री अभ्यास करत असे. मात्र १० वीमध्ये असताना त्याच्या वडिलांची तब्येत खराब झाली आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर पडली.
या दरम्यान हरीकिशनने घरातील लोकांना न सांगता आपल्या एका नातेवाईकाकडून सायकल रिक्षा उधारीवर घेतली. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तो चेहऱ्यावर रुमाल बांधून रिक्षा चालवण्याचे काम करत असे. अशीच लहानमोठी कामे करत हरीकिशनने पुन्हा आपल्या वडिलांचे चप्पल दुरुस्तीचे दुकान सुरु केले. एक दिवस अचानक त्याला स्टेट ट्रेंडिंग कॉर्पोरेशनकडून १० हजार चप्पलांच्या जोडांची ऑर्डर मिळाली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्याला बाटामधूनही ऑर्डर यायला लागली. यानंतर त्याने चप्पल आणि बूट तयार करणारी स्वतःची कंपनी स्थापन केली. हा उद्योग भरभराटील आल्यानंतर हरीकिशनने एक हॉटेल आणि मंगल कार्यालय सुरु केले. त्यानंतर एका हॉस्पिटलची स्थापना केली. यानंतर त्याने गाड्यांची डिलरशीप आणि एक प्रकाशन संस्थेचीही स्थापना केली. अशाप्रकारे अतिशय कठिण परिस्थितीशी सामना करत पुढे आलेला हरीकिशन आज आपल्या स्वतःच्या हिंमतीवर कोट्यधीश बनला आहे. त्याची ही यशोगाथा ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने जगासमोर आणली आहे.