नवउद्योजकांच्या मनात नेहमी व्यवसायाचे नवीन-नवीन विचार डोकावत असतात. पहिले तर एका वर्षात, १०० हुन अधिक कल्पना तरी त्यांच्या मनात येऊन जात असतील. पण जर नवीन व्यवसाय सुरवात करायचा असेल, तर नवउद्योजकांना गरज आहे ह्या कल्पनांवर चिकाटीने काम करण्याची. याच व्यवसायाच्या पूर्व तय्यारीला “बिझिनेस स्टार्टअप” असे संबोधता येईल. यात बाजाराचा अभ्यास, चांगले नियोजन, भांडवल, संस्थात्मक कौशल्ये अश्या अनेक गोष्टी आहेत. जसे इंद्रधनुष्यात सात रंग, लग्नामध्ये सात फेरे, सात वचन आणि सात पावले म्हणजे सप्तपदी असतात; त्याचप्रमाणे उद्योगातसुद्धा सप्तपदी म्हणजे सात महत्त्वाची पावले असतात. सर्व आवश्यक पावले उचलून आपण आपला उद्योग योग्य मार्गाने सुरू करू शकतो. तर बिझिनेस स्टार्टअप ची हि सप्तपदी काय आहे ते आपण पाहू.
१. पहिले पाऊल – उद्योग कल्पनेचा योग्य विचार
उद्योगाची कल्पना नेहमी आपल्या कौशल्य, आवड आणि कुवतीशी निगडित असावी. तसे असेल तर आपली उद्योगक्षमता वाढण्यास मदत होते. त्यानंतर आपल्याला मार्केट चा अभ्यास करणे गरजेचे आहे, ज्याने करून आपण इतरांपेक्षा काही वेगळं देऊ शकतो. आपल्याला उद्योगाच्या नेहमी नवंनवीन कल्पना सुचत असतात; पण प्रत्येक कल्पनेचा योग्य विचार केला तर चांगला व्यवसाय निवडणे सोप्पं जाते. एकदा निवड चांगली झाली की मग व्यवसाय प्रत्यक्षात उतरवणे आणि प्रगती करणे सुकर होते.
२. दुसरे पाऊल – उद्योगाचे नियोजन
आपण जो उद्योग सुरु करणार आहे त्याची संपूर्ण माहिती असणे अवश्यक आहे. प्रत्येक उद्योगाची सुरवात करताना त्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे. नियोजन असेल तर व्यवसायात येणारे अडथळे कमी होतात व सुरळीतपणा येतो. म्हणून उद्योगाचे नियोजन हे व्यवसाय व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे.
उद्योग नियोजनासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता आहे:
- उद्योगाचे संपूर्ण ज्ञान
- उद्योगाची नजीकच्या काळातील आणि भविष्यातील ध्येय
- उद्योगासाठी सर्वोत्तम पर्याय
- उद्योगासाठी लागणारे आर्थिक भांडवल
- योजनेचे मूल्यमापन आणि त्याचा प्रभाव
३. तिसरे पाऊल – उद्योगातील स्रोत
उद्योगाची सुरवात करताना आपल्याकडे कोण कोणते स्रोत उपलब्ध आहेत ह्याची माहिती असणे अवश्यक आहे. बरेच उद्योग सुरवातीला चांगले चालतात पण नंतर अडचणीत येतात अथवा बंद होतात. ह्याचे कारण म्हणजे उद्योग स्रोत्राचा ढासळेला समतोल. हा समतोल बिघडू नये म्हणून काही उद्योगासाठी लागणारे काही स्रोत आहेत. ते खालीलप्रमाणे:
- मूलभूत स्रोत
- मानवी स्रोत
- आर्थिक स्रोत
- शैक्षणिक स्रोत
- भौतिक स्रोत
४. चौथे पाऊल – मार्केटिंग आणि ब्रँडिंग
उद्योगाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे मार्केटिंग आणि ब्रँडिंग. जो पर्यंत तुमच्या वस्तू, उत्पादन किंवा सेवेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत विक्री करणे खूपच अवघड आहे. मार्केटिंग साठी सर्वात पहिले पाऊल म्हणजे आपण कोणते मार्केट आणि ग्राहक गटांना विक्री करु इच्छिता हे ठरवणे आहे. एकदा हे ठरले की कोणती मार्केटिंग माध्यम वापरायची हे ठरवता येते. मार्केटिंग साठी अनेक माध्यम वापरले जातात, ज्यांमध्ये सध्या इंटरनेट चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ब्रँडिंग. ब्रँड म्हणजे आपल्या व्यवसायाची ग्राहकांवर असलेली छाप, जी बनवायला वेळ लागतो. पण एकदा ब्रँड निर्माण झाला, की मार्केटिंग करणे सोईस्कर होऊन जाते. तसेच ब्रँड जर सर्वत्र नावाजला गेला, की उद्योगसुद्धा उंच झेप घेतो.
ब्रँडिंगसाठी खालीलपैकी एखादी गोष्ट करु शकता:
- लोगो किंवा चिन्ह / चित्र ब्रँडिंग
- उत्पादनाचे वैशिष्ट्य / गुणधर्माचे ब्रँडिंग
- उत्पादनाच्या नावाचे ब्रँडिंग
- नामवंत व्यक्ती मार्फत आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग
- टॅगलाइनचे ब्रँडिंग
५. पाचवे पाऊल – अर्थ व्यवस्थापन
नवीन व्यवसायासाठी लागणारे अर्थसहाय्य व त्याचे नियोजन व्यवस्थित करणे अवश्यक आहे. योग्य आर्थिक पुरवठा आपल्याला व्यवसाय सुरु करण्यास व प्रारंभिक काही अवधी तो टिकविण्यास मदत करतो. जर का अर्थ व्यवस्था ढासळली तर मोठ्यातला मोठया उद्योगत पण नुकसान होऊ शकतं. म्हणून अर्थ व्यवस्थापन हे उद्योगातील सगळ्यात महत्त्वाचे पाऊल आहे.
६. सहावे पाऊल – उद्योग देखभालीची यादी निर्मिती
आपला उद्योग योग्य दिशेने चालू आहे का? उद्योगांत काही अडथळे किंवा संकटे येऊ शकतात का? या अश्या अनेक गोष्टींची यादी करणे जरुरी आहे. जर काही अडथळे आले, ते कसे सोडवायचे ह्याचे नियोजन अधीपासूनच हवे. जर नियोजन असेल तर एखादे संकट जरी आले, तरी उद्योजक त्याला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. उद्योग देखभालीची यादी निर्मितीसाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे:
- टू-डू लिस्ट: जे करायचे आहे त्या सर्व गोष्टींची यादी
- रेकॉर्ड ट्रॅकिंग: पूर्वीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची नोंदणी व अभ्यास
७. सातवे पाऊल – उद्योगाची ध्येयनिर्मिती आणि लक्ष्य साधणे
कंपनीच्या यशाचे मोजमाप करण्यासाठी लक्ष्य निश्चित करणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. उद्योग नेहमी सुधारणे, वाढवणे आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसायातील प्रत्येक विभागाला स्वतंत्र लक्ष्य आणि ध्येय विभागून द्यावे. तसेच ठराविक कालावधीने प्रत्येक विभागाचा ध्येयपूर्तीचा अहवाल मागून घ्यावा आणि तपासावा. उद्योगातील समस्या किंवा नविन कल्पना जाणून घेण्यासाठी, त्यात सहभागी असणार्या प्रत्येक व्यक्तीशी नियमित संवाद साधावा.
आता थोडक्यात पाहुयात ऍक्शन प्लॅन:
- उद्योगाचे वैयक्तिक मूल्यमापन
- उद्योगाचे विश्लेषण
- कायदेशीर स्थान
- उद्योगाची नियोजन
- उद्योगाचे परीक्षण आणि त्रुटी
- भांडवलनिर्मिती
- उद्योगाची स्थापना
अशी आहे ही बिझनेस स्टार्टअप ची सप्तपदी. नवउद्योजकांनी काटेकोरपणे या पावलांवर पाऊल ठेवून जर व्यवसायात पदार्पण केले तर नक्कीच फायदा आणि प्रगती होईल.
वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर, आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.