आजच्या शिकलेल्या पिढीला सतावणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे “नोकरी”. आजकाल आपण अनेक शिकलेल्या मुलां / मुलींना नोकरीच्या शोधात वणवण फिरताना पाहतो. ऑनलाईन बरेच ग्रुप आहे कि जिथे नोकरी च्या संधींची माहिती दिली जाते; अश्या ग्रुप मध्ये नोकरी शोधणारे पण खूप जण आहेत. ह्या लोकांमध्ये इंजिनिअरिंग आणि MBA झालेल्या लोकांची संख्या जास्त दिसून येते. पण एवढं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा खरंच नोकरी नाही का? कि चित्र काही वेगळंच आहे? असा प्रश्न नक्कीच पडतो.
मागील काही वर्षां मधे नोकरी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे नोकरी आणि शिक्षणाची वास्तविक परिस्थिती आणि त्याचं उभे केलेलं चित्र ह्या मध्ये किती तफावत आहे हे मी खूप जवळून पाहिले आहे. वास्तविक पाहिलं तर नोकरी करणाऱ्या लोकांची कंपन्यांना खूप गरज आहे. पण दिवसेंदिवस चांगल्या डिग्री असणारे परंतु एम्प्लॉएबल स्किल्स नसणाऱ्यांचीच संख्या वाढत चालली आहे. या गर्दीत चांगल्या स्किल्स असणाऱ्या एम्प्लॉयीज ची कमतरता अनेक कंपन्यांना भासत आहे. आता हे एम्प्लॉएबल स्किल म्हणजे काय, तर नोकरी करण्यासाठी लागणारी तांत्रिक माहिती, काम करण्याची पद्धत, नवीन शिकण्याची आवड, तसेच टिम मधे काम करण्याची क्षमता इ.
आजच्या बदलत्या जागतिक अर्थ कारणामुळे आणि वाढलेल्या स्पर्धेमुळे, कंपन्यांचे प्रॉफिटचे मार्जिन आधी पेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना आधीसारखे फ्रेशर्स मुलां / मुलींना ट्रैनिंग देऊन, मग नोकरी मध्ये समाविष्ट करून घेणे सोपे व व्यावहारिक राहिले नाही. नवीन मुलांना ट्रैनिंग देण्यापेक्षा कंपन्यांना आज ज्या लोकांना कामाचा अनुभव आहे, अश्या लोकांना थोडा जास्त पगार देऊन नोकरी वर ठेवण्यास सोपे वाटत आहे. ह्याचे कारण कि ज्यावेळी नवीन मुले जॉईन होतात, तेव्हा पहिले ६ महिने किंवा १ वर्ष हा त्यांचा ट्रैनिंग कालावधी असतो. ह्या कालावधी मध्ये कंपनीला त्यांच्यावर खर्च करावा लागतो, बऱ्याच गोष्टींची माहिती द्यावी लागते. ह्या खर्चाचा जो बोजा आहे तो वाढत्या स्पर्धेमुळे कंपनी आज उचलू शकत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, एकदा का ह्या फ्रेशर्स चा ट्रेनींग कालावधी पूर्ण झाला कि ह्यांना लगेच दुसऱ्या कंपनी च्या ऑफर येऊ लागतात. अश्यावेळेस अधिक पैसे भेटतील या आशेने, फ्रेशर्स नवीन कंपनी कडे धाव घेतात. त्यामुळे जेव्हा ह्या ट्रैनिंग दिलेल्या लोकांकडुन काम करून घ्याची वेळ येते तेव्हा, हि मुलं लगेच पहिली कंपनी सोडून जास्त पगाराच्या आमिषाने दुसरी कंपनी जॉईन करुन टाकतात. कंपनीचा ह्या मुलांच्या ट्रैनिंग वरच खर्च होतो, प्रत्यक्षात त्यांच्याकडून प्रॉडक्टिव्हिटी अशी काहीच मिळत नाही. शेवटी हे सगळं नुकसानीचंच गणित होतं. या दोन्ही कारणांमुळे, कंपन्या आता फ्रेशर्स घेऊन त्यांना ट्रेनिंग देण्यापेक्षा सरळ पगार वाढवून अनुभवी लोकांना घेतात. हे अनुभवी लोक पहिल्या दिवसापासून कंपनी ला १००% प्रॉडक्टिव्हिटी देतात आणि कंपनी ला त्यांचा पगार देणेही सोयीस्कर वाटते.
अश्या या बदललेल्या नोकरी च्या परिस्थीतीमध्ये फ्रेशर मुलांचे नेमके काय चुकतंय मग?
आजच्या मुलांकडे शिक्षण तर आहे, पण नोकरी साठी हे जे एम्प्लॉएबल स्किल लागतात त्यांची मात्र खूपच कमतरता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काळानुसार आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जो बदल घडायला हवा होता तसा तो फारसा घडलेला नाहीये. तसेच नवीन शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक संकुल तयार झाल्यामुळे शिक्षण तर सुलभ झाले, पण या नवीन संस्थांनी शिक्षणाच्या व्यवसायीकरणावर भर दिला आणि आपोआप शिक्षणाचा दर्जा घसरला. त्यामुळे आज डिग्री घेणे आधी पेक्षा खूप सोपे झाले आहे, पण एम्प्लॉएबल स्किल चा मात्र अभाव आहे. प्रत्येक्षात जर पाहिलं तर ह्या मध्ये मुलांचा काही दोष नाही कारण त्यांचा बाहेरच्या जगाशी एवढा संपर्क नसतोच. शाळा आणि कॉलेज मधे मिळणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे ते आपली वाटचाल करत असतात. मार्गदर्शनाचा अभाव हा सुद्धा फ्रेशर्स ला नोकरी न मिळण्यामागे एक कारण आहे.
अश्या या एकंदरीत डळमळत्या शैक्षणिक परिस्थितीत, नोकरी च्या बदलत्या समीकरणांमध्ये एका विद्यार्थ्याने नक्की काय केले पाहिजे?
ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांनी सर्वप्रथम आपल्याला नोकरी साठी कोणत्या स्किल्स कमी पडत आहेत त्याचा आढावा घ्यावा. या उणिवा भरुन काढण्यासाठी एखादा इंडस्ट्री साठी परिपूर्ण असा कोर्स करावा. आपल्या सॉफ्ट स्किल्स आणि प्रेसेंटेशन स्किल्स वर लक्ष देऊन त्यांमध्ये प्राविण्य मिळवावे. यातून आपल्याला नोकरीची कवाडं नक्कीच खुले होतील.
जे विद्यार्थी अजून शिक्षण घेत आहेत त्यांनी अवांतर वाचन करणे, इंटरनेट चा प्रभावी वापर करुन अधिक माहिती मिळवणे, नवीन स्किल आत्मसात करणे, ज्या गोष्टी येत आहेत त्यात प्राविण्य मिळवणे, छंद जोपासणे अश्या एक ना अनेक गोष्टी कराव्यात. तसेच नोकरी संदर्भात बरीच माहिती असणे अवश्यक आहे. जसे कि, आपल्या क्षेत्रात नोकरीच्या काय संधी आहे, पगार किती आहे, कोणकोणत्या कंपनी नोकरी देऊ शकतात, कोणत्या पदांसाठी फ्रेशर्स ला घेतात, त्या कंपनी मधे ट्रैनिंग करण्याच्या काही संधी आहेत का, कोणत्या शहरात नोकऱ्या जास्त आहेत, नोकरी साठी कोणते स्किल्स लागतात इ. हे सर्व केल्यावर तुम्ही काही नोकऱ्यांसाठी पात्र होऊ शकता आणि इंटरव्हियू मधे पण उत्तीर्ण होऊ शकता.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, इंडस्ट्री मध्ये आज कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. याचं कारण म्हणजे, यांत्रिकीकरणामुळे कंपन्यांमधे कामाचे स्वरूप खूपच बदलले आहे. जुन्या काळात जी नोकरीची ची पदं होती, ती आज राहिली नाहीत. याउलट अनेक नवीन पदं आली आहेत. जी प्रोफाईल आधी एखादा इलेक्ट्रिकल इंजिनीयर करु शकत होता, ती आज इंडस्ट्रीत राहिली सुद्धा नसेल. याच कारणांमुळे इंडस्ट्रीमधे आपल्या शिक्षणाला कोणती प्रोफाईल दिली जाते हे माहिती असणे खूप गरजेचे आहे. या वेगवेगळ्या प्रोफाईलस मधून आपल्याला कोणत्या प्रोफाईल मधे आवड आहे ते ठरवू शकता. मग प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा ह्यासाठी तुम्ही कंपनी मध्ये इंटर्नशिप किंवा ट्रेनिंग प्रोजेक्ट्स करू शकता. अश्याने तुम्हाला कंपनी चालते कशी, कंपनीत कोणती कामे होतात, त्यातले बारकावे काय असतात याची माहिती मिळेल. हिच माहिती पुढे तुम्हाला इंटरव्हियू मधे उपयोगी पडेल.
आपण जर काळाच्या गरजेनुसार आपली शैक्षणिक माहिती आणि नोकरी च्या स्किल्स आत्मसात केल्या तर आपल्यासाठी आज सुद्धा भरपूर नोकऱ्या उप्लब्ध आहेत हेच दिसून येईल. त्यामुळे माझं विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं असेल कि, पुस्तकी शिक्षण सोडुन वरील सांगितल्याप्रमाणे मेहनत करून पुढे तुम्ही आपलं चांगलं कॅरिअर घडवू शकता.
सविस्तर माहिती व चांगलं शिक्षण घ्या आणि आपल्या यशस्वी करिअर च्या दिशेने वाटचाल करा.