आजच्या या स्पर्धेच्या युगात आपल्याला प्रत्येक क्षेत्रांत चुरस पहायला मिळते. त्यातून व्यवसाय क्षेत्रात तर जागतिकीकरणामुळे ही स्पर्धा अधिक वाढली आहे. आपल्याला व्यवसाय वाढवायचा असेल, व्यवसायात टिकवून रहायचे असेल तर आपल्याला आपले नाव, सेवा किंवा आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहचवणे अवश्यक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे महत्त्वाचे झाले आहे. यासाठी आपण वर्तमानपत्र, रेडिओ, बॅनर, टिव्ही अश्या माध्यमचा वापर करू शकतो. पण जाहिरात करणे खर्चीक तर असतेच पण यांचा प्रभाव हा सुद्धा अतिशय अल्पकाळासाठीच असतो.
या सर्व माध्यमांमधे आज इंटरनेटमुळे एक डिजिटल माध्यमाची भर पडली आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन घराघरांत पोहोचले आहेत. आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी लोक इंटरनेटचा वापर करू लागलेत. दिवसेंदिवस इंटरनेट चा वापर वाढतोय आणि त्यामुळे इंटरनेट आता एक पर्याय नाही, पण एक सामान्य गरज निर्माण झाली आहे. आज ह्याच ऑनलाईन असणाऱ्या लोकांनी व्यवसायिकांसाठी एक मोठी डिजिटल बाजारपेठ निर्माण केली आहे. ह्या ऑनलाईन व्यक्तींना आपले ग्राहक बनवण्यासाठी आपल्या व्यवसायाला इंटरनेटशी जोडणे तर अनिवार्य आहेच, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी ऑनलाईन मार्केटिंग पद्धत वापरणे अनिवार्य आहे. हिच ऑनलाईन मार्केटिंग पद्धत म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.
डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी सोशल मिडिया, गुगल च्या अनेक सेवा, ई-मेल, वेबसाईट, मोबाइल ऍप अश्या विविध इंटरनेट माध्यमांचा वापर केला जातो. डिजिटल मार्केटिंग साठी लागणारा खर्च हा इतर माध्यमांपेक्षा खूप कमी आहे आणि म्हणून नविन किंवा छोटे व्यावसायिक सुद्धा याचा वापर करू शकतात. या मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे, आपल्या वस्तूची किंवा सेवांची मार्केटिंग करताना जो समाज आपल्याला ग्राहकवर्ग म्हणून हवा आहे त्यांनाच टार्गेट करून मार्केटिंग करू शकतो. कमी खर्च आणि विशिष्ट ग्राहकांना टार्गेट करण्याच्या क्षमतेमुळे डिजिटल मार्केटिंग एक प्रभावी मार्केटिंग चॅनेल बनले आहे.
डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी विविध इंटरनेट माध्यमांचा उपयोग केला जातो. त्यातील काही माध्यमां विषयी थोडक्यात माहिती पाहू या.
१. वेबसाइट: ऑनलाईन जगात वेबसाइट म्हणजे आपल्या दुकानासारखेच आहे. वेबसाइटवर आपल्या विविध सेवांची अथवा उत्पादनांची माहिती देता येते. या व्यतिरिक्त अनेक डिजिटल मार्केटिंग धोरणांची पूर्तता करण्यासाठी वेबसाइटचा वापर केला जातो. त्यामुळे जर आपल्याकडे एखादा व्यवसाय असेल आणि वेबसाइट नसेल, तर आपण आपल्या व्यवसाय वाढीची उत्तम संधी गमावू शकता. आपली वेबसाइट ही अशी एक जागा आहे, जिथे बहुतेक लोक आपल्या व्यवसायाशी संवाद साधतात. वापरकर्ता आपली वेबसाइट पाहून आपल्या कंपनीविषयी मत तयार करत असतो. त्यामुळे आपल्या वेबसाइटवर आलेल्या वापरकर्त्यांचे समाधान करणे, तसेच त्याला आपल्या वस्तू व सेवा विकत घेण्यास प्रेरित करून त्यास आपले ग्राहक बनवणे हे वेबसाइटचे मुख्य काम असते. डिजिटल मार्केटिंग मधे अनेक ऑनलाइन व ऑफलाईन मार्गांने वापरकर्त्यांना आपल्या वेबसाइटवर पाठवता येते. म्हणून व्यवसाय वृद्धी करण्यास वेबसाइट आणि डिजिटल मार्केटिंग हे सर्वांत महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे.
२. सोशल मीडिया मार्केटिंग: आज अनेक लोक फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, पिंटरेस्ट, लिंक्डइन यासारख्या अनेक सोशल मिडिया माध्यमांवर ऍक्टिव्ह असतात. या सर्व सोशल मिडिया वापरणाऱ्या लोकांना आपल्या ग्राहकांमधे रुपांतरीत करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग चा खूप उपयोग होऊ शकतो. व्यवसायिक सोशल मिडिया वर जाहिरात करू शकतात, ग्राहकांशी संवाद सादु शकतात, त्यांना आपल्या वेबसाइट वर नेऊन विक्री करू शकतात.
३. ई-मेल मार्केटिंग: ई-मेल मार्केटिंग ही डिजिटल मार्केटिंगमधील सर्वात सोपी आणि अतिशय महत्त्वाची पद्धत आहे. ई-मेल मार्केटिंगचा वापर करून व्यवसायिक नवीन ग्राहक मिळवू शकतो. तसेच आपल्या ग्राहकांना आपल्या कंपनीची माहिती, नवीन वस्तू किंवा सेवांची माहिती, नवीन ऑफर्स याविषयी ई-मेलद्वारे कळवू शकतो. यामुळे एखादी व्यक्ती जर एकदा ग्राहक झाली, तर ती आपल्या वस्तू किंवा सेवा पुनःपुन्हा विकत घेतील.
४. मोबईल मार्केटिंग: आजच्या ह्या टेकनॉलॉजी च्या युगात, मोबाइल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. रोजच्या जीवनात स्मार्टफोनचा वाढत्या वापरामुळे हे माध्यम आज डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप प्रमाणात वापरले जाऊ लागले आहे. मोबाइल मार्केटिंग हे ग्राहकांशी थेट संवाद साधण्याचा आणि उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी एक सोपा आणि अधिक चांगला मार्ग प्रस्तुत करते. सध्या जगातील एकूण इंटरनेट युजरपैकी ८०% पेक्षा जास्त लोक स्मार्टफोनचा वापर करतात. या लोकांपर्यंत व्यवसायिक आपल्या कंपनीच्या वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाइल अॅप्स तयार करून पोहचु शकतात. कंपनीच्या मोबाइल अॅपद्वारे, लोक त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा सेवा ऑनलाईन विकत घेऊ शकतील.
५. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन: इंटरनेट वर माहिती शोधण्यासाठी अनेक सर्च इंजिन चा वापर होतो. त्यामध्ये गुगल, बिंग, याहु, आस्क डॉट कॉम, बैडू अशी अनेक आहेत. सर्च इंजिन वर आपण जर एखादी माहिती शोधली तर, ती माहिती असणारी कोणती वेबसाइट कोणत्या क्रमाने दाखवली जाईल याचे काही ठोकताळे आहेत. सर्च इंजिनमध्ये आपली वेबसाइट वरच्या स्थानी (सर्वात वरती) येण्यासाठीची एक प्रोसेस आहे, त्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतात. समजा, आपली प्रिंटिंग प्रेस पुण्यामध्ये आहे. जर एखाद्या व्यक्तीला प्रिंटिंगचे काम करायचे असेल, तर तो सर्च इंजिन (उदा. गुगल) मध्ये जाऊन “प्रिंटिंग प्रेस पुणे” असे टाइप करेल. त्यानंतर आपल्या कंपनीची वेबसाइट वरच्या (उच्च) स्थानी येण्यासाठी करावी लागणारी प्रोसेस म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. अनेकदा आपण कोणती सेवा किंवा वस्तू शोधत असाल तर गुगल (सगळ्यात जास्त वापरलं जाणारं सर्च इंजिन) वर पहिल्या (फार फार तर दुसऱ्या) पानावर येणाऱ्या वेबसाइट वर क्लिक करतो. एक व्यवसायिक म्हणून या पहिल्या पानावर आपली वेबसाइट दाखवली गेली पाहिजे हे विक्री होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि या साठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन खूप उपयोगी ठरते.
वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर, आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.
Digital marketing